नवी दिल्ली – “कोविड-19′ अर्थात “करोना’ व्हायरसच्या प्रभावामुळे जगभरच्या सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे. भारतातील ख्यातकीर्त इंडियन प्रिमियर लीग स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यानंतर, विविध क्रीडा स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या आहेत अथवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने दि. 14 ते 31 मार्चदरम्यान व्हावयाच्या सर्वच सामने आणि स्पर्धांना सध्या स्थगित केल्याचे जाहीर केले आहे. यादरम्यान खेळले जाणारे सामने कधी घ्यायचे, त्याबाबत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची एकदिवसीय क्रिकेट मालिका रद्द करण्यात आली. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, मुथय्या मुरलीधरनसारखे खेळाडू रोड सेफ्टी सिरीजमध्ये खेळत होते. ही स्पर्धा चांगलीच लोकप्रियही झाली होती. पण करोना व्हायरसमुळे आता ही स्पर्धा रद्द करावी लागली आहे. आता ही स्पर्धा पुन्हा कधी खेळवण्यात येईल, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही.