नवी दिल्ली – सध्या बँकांमध्ये ठेवी ठेवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे इतर बँकाबरोबर सरकारी बँका ठेवी आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही या प्रयत्नांना यश मिळत नसल्याचे वातावरण आहे मात्र अशा परिस्थितीतही महाराष्ट्र बँकेने ( Bank Of Maharashtra) ठेवी आकर्षित करण्यात इतर सरकारी बँकांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे.
डिसेंबर अखेर संपलेल्या तिसर्या तिमाहीत दहा टक्क्यापेक्षा जास्त ठेवी आकर्षित करण्यात केवळ स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँक यशस्वी झाली आहे. पुण्यात मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र बँकेकडील ठेवीच्या प्रमाणात 17.89% वाढ झाली आहे. तर स्टेट बँकेच्या ठेवीच्या प्रमाणात 12.84 टक्के वाढ झाली आहे.
तिसर्या क्रमांकावर सेंट्रल बँक असून या बँकेच्या ठेवीच्या प्रमाणात 9.53% वाढ झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ठेवीच्या प्रमाणात 9.10 टक्के वाढ झाली आहे. कासा ठेवीच्या वाढीत म्हणजे करंट अकाउंट सेव्हिंग अकाउंट ठेवीच्या वाढीत महाराष्ट्र बँक सर्वोच्च स्थानावर असून एकूण ठेवीमध्ये कासा ठेवीचे प्रमाण 50.19% इतके आहे. सेंट्रल बँकेचे प्रमाण 48.98% इतके आहे. कासा ठेवीच्या माध्यमातून बँका कमी व्याजदरावर भांडवल आकर्षित करत असतात. यामध्ये महाराष्ट्र बँक आघाडीवर आहे.
महाराष्ट्र बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता सर्वात कमी म्हणजे 2.04% आहे. तर स्टेट स्टेट बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 2.42% इतकी आहे. निव्वळ उत्पादक मालमत्ता कमी ठेवण्यातही महाराष्ट्र बँक अग्रस्थानी असून महाराष्ट्र बँकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता केवळ 0.22% आहे. दुसर्या क्रमांकावरील इंडियन बँकेची निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 0.53% इतकी आहे.
महाराष्ट्र बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 16.85% आहे. इंडियन ओव्हरसिज बँकेचे भांडवल पर्यंतचा प्रमाण 16.80% तर पंजाब अँड सिंध बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण 16.13 टक्के आहे.
12 सरकारी बँकांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये 98,355 कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. गेल्या पूर्ण वर्षांमध्ये हा नफा 1,04,649 कोटी रुपये होता. तिसर्या तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेचा नफा सर्वात जास्त म्हणजे 253 टक्क्यांनी वाढून 2,223 कोटी रुपये झाला. बँक ऑफ इंडियाचा नफा 62 टक्क्यांनी वाढून 1,870 कोटी रुपये झाला आहे.
तर युनियन बँकेचा नफा 60 टक्क्यांनी वाढून 3,590 कोटी रुपये झाला आहे . मात्र स्टेट बँक, युको बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेचा नफा अनुक्रमे 35.49 टक्क्यांनी, 22.97 टक्क्यांनी आणि 69.44 टक्क्यांनी कमी झाला आहे.