बेल्हे -बांगरवाडी (ता. जुन्नर) येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र गुप्त विठोबा देवस्थानचा आषाढी एकादशी यात्रा उत्सव सोहळ्यात यावर्षी अवघ्या 20 ते 25 भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नरेंद्र गोराने यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी पूजेचे मानकरी नरेंद्र गोराने व गजानन फराटे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
निसर्गरम्य वातावरणात श्रीक्षेत्र गुप्त विठोबा गुहेमध्ये वसलेले देवस्थान आहे. दरवर्षी सोहळ्यासाठी एक लाखांवर भाविक दर्शनाला येतात. करोना रोखण्यासाठी देवस्थानच्या वतीने बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सिजनचे सिलेंडर व किट डॉ. एस. बी. थोरात यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. शासकीय महापूजा झाल्यानंतर मंदिर बंद करण्यात आले.