Mahadev Betting App : सध्या देशभरात ‘महादेव बेटिंग अॅप’ हे प्रकरण चर्चेत आले आहे. महादेव बेटिंग ऍपच्या प्रवर्तकांनी छत्तिसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना 508 कोटी रूपये दिल्याची माहिती चौकशीतून पुढे आली, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला.
यानंतर पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे. महादेव बेटिंग अॅप आणि त्याचे संस्थापक सौरभ चंद्राकर याने मागील काही दिवसांपासून छत्तीसगडच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. संबंधित प्रकरणावर देशभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
अश्यातच, या सगळ्या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तिखट शब्दात टीका करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर केले आहेत.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “भूपेश बघेल भाजपमध्ये सहभागी झाले तर त्यांना तिथे देवाचं स्थान दिलं जाईल. त्यांच्यावर हरहर महादेव म्हणत अभिषेक केला जाईल. महाराष्ट्रात अजित पवार, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे देखील महादेव अॅपचेच सदस्य आहेत ना?
त्यांची पुजा केली जाते. त्यांना जेलमध्ये पाठवायचं होतं. आता त्यांची पुजा केली जातेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्यावर फुलं उधळत आहेत’, अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली.