मुंबई – 15000 कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या महादेव बेटिंग ऍप प्रकरणाचा तपास आता मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. यापूर्वी 14 नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी डाबरचे संचालक गौरव बर्मन आणि कंपनीचे अध्यक्ष मोहित बर्मन यांच्यासह 32 जणांवर घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
महादेव बेटिंग ऍप प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून या महिन्याच्या सुरुवातीला माटुंगा पोलिसांनी महादेव बेटिंग ऍपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी यांच्यासह 32 हून अधिक जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, आरोपींनी लोकांची 15,000 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींवर हवाला व्यवहारातून पैसे मिळवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी साहिल खान, गौरव बर्मन, मोहित बर्मन आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अंमलबजावणी संचालनालय महादेव बुक ऑनलाइन बेटिंग एपीपी सिंडिकेटची चौकशी करत आहे,
ज्यामध्ये या सट्टेबाजी सिंडिकेटचे प्रवर्तक कथितपणे परदेशात बसून त्यांचे मित्र आणि सहकारी यांच्या मदतीने भारतभर हजारो पॅनल चालवत आहेत. ईडीच्या विनंतीवरून 5 नोव्हेंबर रोजी केंद्राने महादेव ऍपसह 22 बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी आदेश जारी केला होता.