नवी दिल्ली – स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात घटनाकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. 26 नोव्हेंबरला संविधान दिनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. देशातील कोणत्याच न्यायालयाच्या प्रांगणात आंबेडकर यांचा पुतळा नाही. मात्र, आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात पुतळा विराजमान होणार आहे. हरियाणातील मानेसर येथे पुतळ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. 7 फूट उंचीच्या या पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर यांनी वकिल पोशाख आणि हातात संविधानाची प्रत धारण केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात समोरच्या हिरवळीवर आणि बागेत डॉ. आंबेडकरांचा पुतळा बसवला जाईल.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध शिल्पकार नरेश कुमावत यांनी शिल्प तयार केले आहे, जे सध्या हरियाणामध्ये याला फिनिशिंग टच देत आहेत. पुतळ्याचे व्यासपीठ सध्या जवळपास 50 मजुरांकडून पूर्णत्वाकडे जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात सध्या महात्मा गांधींचा एक पुतळा आहे. जो सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या समोर आहे. गेल्या वर्षी, तीन वकिलांनी भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती.