खांडवा (मध्य प्रदेश) :- गेल्या सलग तीन दिवसांपासून मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात पावसाने कहर केला असून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. संततधार पावसामुळे आदिगुरू शंकराचार्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम तीन दिवस पुढे करून 21 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
खंडवा येथील धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या ओंकारेश्वर येथील ओम पर्वतावर उभारण्यात आलेल्या आदिगुरू शंकराचार्यांच्या बालपणीच्या मूर्तीचे शिल्पकार जागतिक किर्तीचे महाराष्ट्रीयन भगवान रामपुरे असून, मागील दहा दिवसांपासून हा पुतळा त्यांच्या देखरेखीखाली पूर्णत्वाला पोहोचत आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्तेच या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या काळात राज्यात सक्रिय मान्सूनमुळे संततधार पाऊस सुरू असून आता हा पाऊसही राज्यातील जनतेसाठी आनंददायी ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दुष्काळ पडला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उज्जैन महाकाल मंदिरात चांगल्या पावसाची प्रार्थनाही केली होती.
असा आहे पुतळा…
12 वर्षीय बाल शंकराचार्यांचा पुतळा
शिल्पकार भगवान रामपुरे
ब्रॉंझ अर्थात कांस्य धातूचा वापर
108 फूट पुतळ्याची उंची
54 फूट उंच चबुतरा
27 फूट उंच कमळाच्या पाकळ्या
15 महिने प्रकल्प कालावधी
रु.2141.85 कोटी रुपये खर्च
इंदूरपासून 80 किमी अंतरावर असलेल्या नर्मदातटीच्या ओंकारेश्वर येथील ओम पर्वतावर हा पुतळा उभारण्याची लगबग सुरु आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर येथील “एकात्म धाम’ येथे “एकात्मतेची प्रतिमा’ या नावाने हा पुतळा उभारला जात आहे.