दमोह – मध्य प्रदेशातील दमोह येथील मद्यविक्रेते शंकर राय आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या परिसरात गुरुवारी सकाळी सहा वाजता सुरू झालेली आयकर विभागाची कारवाई शुक्रवारी रात्री नऊ वाजता संपली. राज्यातील विविध ठिकाणच्या पथकांनी सुमारे 39 तास राय कुटुंबाच्या दहाहून अधिक ठिकाणी छापे टाकले. आयकर विभागाचे जबलपूरचे सहआयुक्त मुनमुन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल आठ कोटी रोकड आणि तीन किलो सोने जप्त करण्यात आले आहे.
आयकर विभागाच्या छाप्या आधी राय यांनी एक कोटी रुपये पोत्यांमध्ये भरून पाण्याच्या टॅंकरमध्ये टाकले होते. त्या नोटाही अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. राय कुटुंबाचे प्रमुख शंकर राय हे काँग्रेसचे नेते आणि माजी नगर पालिका अध्यक्ष आहेत, तर त्यांचे भाऊ कमल राय हे भाजप नेते आणि नगरपालिकेचे उपाध्यक्ष राहिले आहेत. या कुटुंबात दारू व्यवसायाबरोबरच वाहतूक, हॉटेल, बिअरबार, पेट्रोल पंप यासह परवानाधारक सावकारकीचाही व्यवसाय आहे. कारवाईनंतर सहआयुक्तांनी सांगितले की, प्रत्यक्ष छापा संपला आहे, मात्र जप्त केलेल्या कागदपत्रांची भोपाळमध्ये चौकशी केली जाईल. तपासानंतरच अंतिम आकडा समोर येईल.