तळेगावातून घेतले ताब्यात : शिक्रापूर पोलीस व मध्यप्रदेश पोलिसांची कामगिरी
शिक्रापूर- मध्यप्रदेश राज्यातील एका अल्पवयीन युवतीने एका युवकाने चार महिन्यांपूर्वी अपहरण केलेले असताना त्या ठिकाणी अपहरण बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, तर या घटनेला मध्यप्रदेशमध्ये गंभीर स्वरूप प्राप्त झालेले असताना स्वतः मध्यप्रदेश राज्यातील शिवणी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्वतः लक्ष घातलेले होते तर या अपहरण झालेल्या युवतीला पालकांच्या ताब्यात देण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून मध्यप्रदेश पोलिसांनी या युवतीला ताब्यात घेतले आहे.
लखनादौन (ता. लखनादौन, जि. शिवणी, राज्य मध्यप्रदेश) येथील प्रिती यादव या सोळा वर्षीय युवतीने अपहरण झाले होते. याबाबत शिवणी पोलीस स्टेशन येथे अपहरणबाबत गुन्हा दाखल केला होता. युवतीचे छोटू उमाशंकर परहाना (रा. करणपूर, ता. लखनादौन जि. शिवणी) याने अपहरण केले असल्याची बाब समोर आली होती. परंतु प्रिती व छोटू या दोघांचा देखील शोध लागत नव्हता.
दरम्यानच्या काळामध्ये मध्यप्रदेश राज्यातील या घटनेने वेगळे वळण घेतले होते. त्यामुळे शिवणी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्वतः या घटनेमध्ये लक्ष केंद्रित केले होते. यावेळी या युवतीला आरोपी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यांनतर मध्यप्रदेश पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने या युवतीचा शोध सुरू केला.
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दोघे असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर दोनवेळा युवतीला शोधण्याचा प्रयत्न फोल गेला. परंतु त्यानंतर मध्यप्रदेश राज्यातील लखनादौन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक एन. पी. चौधरी, हवालदार मनमोहन मिश्रा, धनेश्वर सिंग, महिला पोलीस साधना कुमारी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, अनिल जगताप, अंकुश चौधरी, निखील रावडे यांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे तळेगाव ढमढेरे भागातील एका घरातून दोघांना ताब्यात घेतले. मध्यप्रदेश पोलिसांसह प्रीती यादव या सोळा वर्षीय युवतीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. यावेळी मध्यप्रदेश पोलिसांनी शिक्रापूर पोलिसांचे आभार मानले.