कराड – जादा टक्केवारीने पैसे देण्याचे आमिष दाखवून दोघांना ऑनलाईन नेट बॅंकींगद्वारे व रोख स्वरूपात मागणी करून सुमारे वीस लाख रूपयांना गंडा घातला. याबाबत अमित रघुनाथ आंबेकर (वय 31 रा. त्रिमुर्ती कॉलनी, कार्वे नाका, कराड) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून हरिदयाल रंजनदास गुप्ता (वय 39 रा. पुणे) याच्यावर फसवणूक प्रकरणी कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आंबेकर हे श्रीराम फायनान्स कंपनीत सिनीयर अकांऊट ऑफिसर म्हणून काम करतात. कराडात एका हॉटेलमध्ये अमोल कांबळे या व्यक्तीने रंजनदास गुप्ता यांची आंबेकर यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी गुप्ता यांनी शेअर मार्केट, बॅंकीग व गुंतवणूक यावर चर्चा करून आंबेकर यांच्याशी कायम संपर्क ठेवला. आंबेकर यांच्या नावे शेअर डी मॅट अकाऊंट प्रपीट मार्ट सिक्युरीटीज प्रा. लि. कल्याणीनगर पुणे यांच्या कंपनीचे असल्याने त्यांची फ्रॅंचाईजी अमोल कांबळे हे चालवित होते.
या कंपनीचा आर्थिक व्यवहार बघून आंबेकर यांच्याशी संपर्क करून गुप्ता याने माझी निवेश इन्वेस्टर प्रा. लि. नावाची फायनान्सीयल कंपनी आहे असे सांगून आंबेकर यांचा विश्वास संपादन केला. या कंपनीत तुम्ही गुंतवणूक करा, तुम्हाला जादा टक्केवारीने रक्कम परत करतो असे आमिष दाखवले. त्यानंतर आंबेकर यांनी त्यांच्या अकाऊंटमधून सप्टेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या चार महिन्यात वेगवेगळ्या अकाऊंटमधून 13 लाख 5 हजार रूपये हरीदयाल रंजनदास गुप्ता याच्या अकाऊंटवर ऑनलाईन व नेटबॅंकींगद्वारे व रोख स्वरूपात जमा केले. त्यानंतर गुप्ता याचेशी आंबेकर यांनी संपर्क साधला असता कधी फोन न उचलणे, फोन बंद करून ठेवणे असे चालू केले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे आंबेकर यांच्या लक्षात आले.
गुप्ता हा जिथे कामाला होता त्याचा पत्ता शोधून आंबेकर यांनी शोध घेतला असता त्यास सदर कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आलेचे समजले. नंतर आंबेकर यांनी त्याचे फुरसुंगी पुणे येथील राहते घरी जावून त्याचा शोध घेतला असता तेथेही तो नसल्याचे व अन्य लोकांचीही फसवणूक करून कोठेतरी निघून गेल्याचे समजले.
आंबेकर यांच्यासह त्यांचे मित्र सचिन गोजाबा वाघमारे( रा. वहागाव ता. कराड) यांनाही जादा टक्केवारीने पैसे देतो असे आमिष दाखवून वाघमारे यांनी गुप्ता याच्या अकाऊंटवर वेळोवेळी 6 लाख 82 हजार 500 रूपये ऑनलाईन व नेटबॅंकींगद्वारे व रोख स्वरूपात जमा केले. अशाप्रकारे हरिदयाल गुप्ता याने निवेश इन्वेस्टर प्रा. लि. कंपनीच्या नावे जादा टक्केवारीने पैसे देतो असे आमिष दाखवून दोघांकडून सुमारे वीस लाख रूपये घेऊन दोघांची फसवणूक केली. याबाबत अमित आंबेकर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी हरिदयाल गुप्ता याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.