भोपाळ :- मध्य प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी सोमवारी राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आलेल्या घटनेचे स्वागत केले आहे.
कमलनाथ यांनी म्हटले आहे की, प्रत्येकाने राहुल गांधी यांनी दिलेला “डरो मत’ हा मंत्र जपण्याची गरज आहे. आता पुन्हा संसदेत जनतेला निर्भयपणा देणारी आणि लोकशाहीच्या विरोधकांमध्ये भीती निर्माण करणारी डरो मतची सिंहगर्जना पुन्हा ऐकू येईल, असे कमलनाथ यांनी ट्विट केले आहे.
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कॉंग्रेस अध्यक्ष कमलनाथ, शशी थरूर आदी नेत्यांनीही राहुल गांधी यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आल्याच्या घटनेचे स्वागत केले आहे.
राहुल गांधी यांना पुन्हा संसदेत येता येणार असल्याने विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये जोश भरल्याचे वातावरण आज संसदेतही दिसले. संसदेच्या आवारात राहुल यांचे अभिनंदन करण्यासाठी विरोधी आघाडीतील नेत्यांची झुंबड उडाल्याचेही पहायला मिळाले.