नगर – जिल्ह्यात जामखेड, राहाता या तालुक्यात सुरवातील डोळे आल्याचे रुग्ण आढळून आले होते. मात्र आता या आजाराचा झपाट्याने संसर्ग होत असल्याचे दिसून आले असून ग्रामीण भागात तब्बल 2 हजार 277 जणांना डोळे आले आहेत. साथ झपाट्याने वाढू लागल्याने आरोग्य विभागाने देखील तातडीने उपययोजना सुरू केल्या असून एक ऑगस्टपासून सर्वेक्षणाची मोहिम हाती घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.
सध्या राज्यभरात डोळे येण्याची साथ झपाट्याने पसरत आहे. जिल्ह्यामध्ये देखील डोळे येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने 1 ऑगस्ट पासून ग्रामीण भागात डोळे येणाऱ्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर आशा वर्कर मार्फत हा सर्वे केला जात आहे. डोळे येण्याची साथ पसरत आहे, परंतु रुग्णांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तींनी गर्दीत जाणे टाळावे तसेच तत्काळ उपचार घ्यावेत. शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये एप्लीकॅप निंबोळी ट्यूब तसेच डोळ्यांसाठी आवश्यक ड्रॉप्स उपलब्ध आहेत. नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेतून उपाय योजना हाती घेण्यात आले आहेत, असे डॉ. नागरगोजे यांनी स्पष्ट केले.
नगर शहरातील रुग्ण वाढतायंत
नगर मनपा हद्द 63, अकोले 314, जामखेड 76, कर्जत 125, कोपरगाव 61, नगर 39, नेवासे 157, पारनेर 242, पाथर्डी 102, राहता 159, राहुरी 96, संगमनेर 456, शेवगाव 20, श्रीगोंदे 91, श्रीरामपूर 276 डोळे आलेले रुग्ण आढळून आले आहेत. तर 593 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.