भोपाळ – मध्यप्रदेशातील राजकारणावर प्रदीर्घ काळ पकड ठेवणारे भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नवे मुख्यमंत्री निश्चित झाल्यानंतर शिवराज यांनी ते पाऊल उचलले. त्यांनी शनिवारीच सोशल मीडियावर रामराम अशी पोस्ट टाकून स्वत:चे राज संपत असल्याचे जणू संकेतच दिले होते.
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार न देता भाजप मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीला सामोरा गेला. त्यामुळे त्या राज्याची सत्ता राखली तरी पक्ष शिवराज यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यास उत्सुक नसल्याचे मानले गेले. भाजपने दिमाखदार यश मिळवून मध्यप्रदेशची सत्ता राखली. त्यानंतर पक्षाने त्या राज्यात नेतृत्वबदलाचा प्रयोग केला आहे. त्यामुळे पाचव्यांदा मुख्यमंत्री बनण्याची शिवराज यांची संधी हुकली. त्यांच्या नावावर सर्वांधिक काळ मुख्यमंत्रिपद भुषवणारा भाजप नेता हा विक्रम जमा आहे.
शिवराज हे ६४ वर्षे वयाचे आहेत. त्यामुळे ते अजून बराच काळ राजकीय इनिंग खेळू शकतात, असे मानले जाते. त्यातून त्यांना केंद्रात जबाबदारी दिली जाऊ शकते, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्या नव्या इनिंगची संधी शिवराज यांना मिळणार का आणि केव्हा या प्रश्नांची उत्तरे आगामी काळात मिळू शकतील.