Shivraj Singh Chouhan- मध्यप्रदेशच्या नेतृत्वाविषयीचा सस्पेन्स कायम असतानाच मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी त्यामध्ये आणखी भर घालणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली. त्यामधून त्यांनी सभी को रामराम असे म्हटले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवराज यांनी पुन्हा येण्याचे की जाण्याचे संकेत दिले याविषयीच्या चर्चांना त्यामुळे तोंड फुटले आहे.
मध्यप्रदेशची सत्ता राखणारा भाजप नेतृत्वाबाबत जैसे थे स्थिती ठेवणार की नेतृत्वबदल करणार ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे. आता सोमवारी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री निश्चित होईल. तशात बैठकीच्या दोन दिवस आधी शिवराज यांनी सूचक पोस्ट केली.
त्यामध्ये त्यांनी स्वत:च्या हात जोडलेल्या छायाचित्रासमवेत रामराम म्हटले. रामरामचे दोन अर्थ निघतात. अभिवादन करताना किंवा निरोप घेताना त्या शब्दप्रयोगाचा वापर होतो. साहजिकच, शिवराज यांची पोस्ट मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी रामराम म्हणण्याचा उलगडा सोमवारी भाजपच्या बैठकीनंतरच होऊ शकेल.
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देण्याचे टाळून भाजपने मध्यप्रदेशातील निवडणूक लढवली. त्यामुळे त्या पदाची शर्यत पक्षाने खुली ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्यातून सत्ता राखली तरी शिवराज यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची शाश्वती पक्षाने दिली नसल्याचे मानले गेले. त्यामुळे मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाविषयी भाजप काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.