गोंदवले -2019 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान पटकावत पाच गुणवंतांनी माण तालुक्याचा डंका वाजवला आहे.
गोंदवले बुद्रुक येथील व सध्या कोल्हापूर येथे पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या प्रेरणा कट्टे यांची लहान बहीण प्रगती कट्टे यांची महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत नायब तहसीलदार पदावर निवड झाली आहे. तर गोंदवले बुद्रुक येथील गौरी कट्टे हिची मंत्रालयात कक्ष अधिकारी पदासाठी निवड झाली आहे.
तसेच लोधवडे येथील चैतन्य कदम यांची पोलीस उपअधीक्षक पदासाठी निवड झाली आहे. शिवाय सध्या सातारा याठिकाणी विक्रीकर उपायुक्त असलेल्या पळशी येथील विकास गंबरे यांने दुसऱ्या वेळी राज्यसेवा परीक्षेत यश मिळविले असून त्याची तहसीलदार पदावर निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेत दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांनी चौकार मारला असून राज्यात माण तालुक्याचा डंका कायम ठेवला आहे.
लोधवडे येथील चैतन्य कदम यांची यापूर्वी सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदी निवड झाली होती. यानंतर त्यांनी यावेळी पोलीस उपअधीक्षक या पदावर निवड झाली आहे. माणमधील जाधववाडी येथील प्रवीण जाधव यानेही राज्यसेवा परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळवले असून सध्या मंडल कृषी अधिकारी पदावर असलेल्या प्रवीणची यावेळी नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. या निवडीने माण तालुक्यातील लोधवडे, गोंदवले बुद्रुक, पळशी व जाधववाडी या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. या सव अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.