करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालत असल्यामुळे हा विळखा सर्वत्र पसरू लागला आहे. गेल्या तीन महिन्यांत संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. करोनाच्या भीषण वास्तवाशी सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र झटत आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा तर विविध सुविधांसाठी महसूल यंत्रणा कार्यमग्न आहे. यासाठी अनेक कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या बरोबरीने आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका रात्रंदिन गावपातळीवर कार्य करीत आहेत. करोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी आणि ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आ. मकरंद पाटील यांनी बाधित गावांना वेळोवेळी भेट देऊन लोकांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच बाधित रुग्णांच्या कुंटुंबाना आधार देण्याचे काम केले. वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालयामधील आरोग्य कर्मचारी व रुग्ण यांच्या कपडे स्वच्छतेसाठी वॉशिग मशीन उपलब्ध करुन दिली आहे. वेळोवेळी लोकांना आवश्यक ती मदत पोहचविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. यापुढेही सर्व यंत्रणेला वैद्यकीय साहित्य कमी पडू नये, यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून 16 लाख 64 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यांतील कोव्हिड केअर सेंटर, तीन ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे या ठिकाणी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीतून 5000 मास्क (एन. 95), 2000 हॅंडग्लोज, 1000 पीपीई कीट, 1000 लिटर सॅनिटायझर, 1000 लिटर सोडियम हायपोक्लोराईड औषध, 1000 लिटर हॅंड वॉश, 1000 लिटर डेटॉल लिक्विड, 50 टेम्परेचर थर्मामीटर (गन) हे साहित्य उपलब्ध झाले आहे.
यामुळे आरोग्य विभागाला अधिक सक्षमपणे काम करता येणार असून करोनाला आळा घालण्यास मदत होणार आहे. आ. मकरंद पाटील यांनी करोनाच्या या संकटकाळात उपलब्ध करुन दिलेल्या वैद्यकीय साहित्यामुळे कर्मचारी वर्गातून व मतदारसंघातील जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सातारा, दि. 20 (प्रतिनिधी)- करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र भीती पसरली आहे. या महामारीतून बाहेर पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मेहनत घेत आहे. विशेषत: आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. अशा परिस्थितीत वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील लोकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी वैद्यकीय सुरक्षा साहित्य खरेदी करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून 16 लाख 64 हजार रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला करोनाला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे.