पुणे – महाविकास आघाडीमधील पक्षांची अवस्था ही आगामी फेब्रुवारीत कठीण होणार आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी काॅंगे्रसमधील जेवढे लोक भाजपमध्ये येतील, त्यांच्याकरिता कमळाचा दुपट्टा तयार असेल, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला शुक्रवारी टोला लगावला.
फर्गसन महाविद्यालयात ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’तर्फे आयोजित ‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला बावनकुळे भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, मराठा समाजाला फायदेशीर व दीर्घकाळ टिकणारे आरक्षण सरकारकडून दिले जाईल. मराठा समाजाला पुन्हा कोणत्याही प्रकारच्या न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागू नये, याची काळजी सरकार घेत आहे.
राज्यात दारू विक्रीसाठी वर्षाअखेरीस राज्य सरकारने परवानगी दिली आहे. याबाबत बावनकुळे म्हणाले, मी या विभागाचा तीन वर्षे मंत्री होतो. त्यामुळे मला अनेक गोष्टींची माहिती आहे. राज्यात दारू बंदी केली जाते, त्याठिकाणी काळ्या बाजारात मोठय़ा प्रमाणावर दारू विक्री होत असते. त्यामुळे अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकार कधी-कधी अशाप्रकारची पावले उचलते. ज्याला दारू घ्यायची आहे, तो घेणारच आहे. ज्याला प्यायची आहे तो पिणारच आहे, परंतु पिताना व घेताना या दोघांना अडचणी निर्माण होतात, त्यात विषारी दारूचे प्रकार घडल्याने अशाप्रकारे निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.