राजगुरुनगर – वाफगाव (ता. खेड) येथील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 7 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर मंजूर केला. येत्या 6 जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन किल्ले वाफगाव येथे परंपरेप्रमाणे साजरा होणार आहे. तेव्हापासून संवर्धन कामाला सुरवात होणार असल्याचे भूषणसिंह राजेंनी सांगितले.
शरद पवार, अजित दादा यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मिटिंग मध्ये रयत शिक्षण संस्थेने संवर्धन कार्यास मंजुरी दिली आहे. किल्ल्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाला. किल्ल्यामधील शाळाही लवकर स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पण तोपर्यंत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ न देता शाळेच्या वापरातील इमारती वगळून संवर्धन कार्यास सुरवात करण्यात येणार आहे.
हिंदवी स्वराज्याच्या सीमा अटकेपार नेण्यामध्ये होळकर घराण्याचे मोलाचे योगदान आहे. या पराक्रमी होळकर घराण्याचे वाफगाव (ता. खेड) हे मूळ गाव. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी वाफगावला हा भव्य भुईकोट किल्ला उभारला. या किल्ल्याला सात भव्य दगडी बुरुज असून मुख्य किल्ल्यामध्ये भव्य प्रवेशद्वार, राणी महाल, विष्णु पंचायतन, बुरुजातील विहीर, राजसदर, पश्चिम द्वार, भूमिगत खलबतखाने, होळकर कालीन तोफा अश्या अनेक सुंदर वास्तू आज ही होळकरशाही ची साक्ष देत दिमाखात उभ्या आहेत. सध्या किल्ल्या मध्ये रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे.
किल्ल्याचे जतन संवर्धन व्हावे, ही लोक भावना आहे. यामुळे वाफगाव व परिसराचा विकास होईल, येणार्या पिढ्याना तो प्रेरणा देत राहावा यासाठी होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंह राजे होळकर हे अनेक वर्षां पासून प्रयत्न करत होते. ते स्वतः वास्तू विशारद असून किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचा आराखडा त्यांच्या टीमने तयार केला आहे.