हे गणराया, सर्व विघ्ने दूर कर (अग्रलेख)

तमाम भारतीयांच्या विशेषतः मराठी जनांचा सर्वांत आवडता उत्सव असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. महापुरासारख्या दुःखद घटनांच्या पार्श्‍वभूमीवर या सणाला प्रारंभ होत असला तरी भाविकांच्या उत्साहावर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व दुःख आणि त्रास बाजूला ठेवून भाविक आज गणरायाचे स्वागत करतील. “विघ्नहर्ता’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या लाडक्‍या बाप्पाकडे त्यानिमित्ताने एकच मागणे आहे. ते म्हणजे हे गणराया तुझ्या भक्‍तांच्या मार्गातील सर्व विघ्ने दूर कर. नैसर्गिक आपत्ती आर्थिक मंदीचे आणि बेरोजगारीचे संकट आणि दहशतवादाचे सावट अशी अनेक विघ्ने सध्या समोर उभी आहेत. ती सर्व दूर करून भारतीयांना विश्‍वास देण्याचे काम या उत्सवाच्या निमित्ताने व्हायला हवे गणेशावर सर्वांचीच श्रद्धा असल्याने भाविकांना आपली विघ्ने दूर होतील असा विश्‍वास आहे. तरीही या उत्सवात सरकार, गणेश मंडळे आणि सामान्य नागरिक यांनीही हा उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी हातभार लावायला हवा. प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले तर या उत्सवात कोणतेच विघ्न येणार नाही.

गणेशाचा हा उत्सव मंगलकारक आणि आनंददायी आहे. त्यामुळे सर्वांत प्रथम सर्वसामान्य नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून हा उत्सव आनंददायी करायला हवा. आपल्या घरच्या आणि सार्वजनिक गणपतीमुळे अन्य कोणाला त्रास होईल असे वर्तन केले जाऊ नये. काळानुरूप घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवात बदल होणे स्वाभाविक असले तरी मूळ उत्सवातील पावित्र्य आणि मांगल्य हरवणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी. गणेशोत्सवामुळे जल, वायू आणि ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी.

डॉल्बीवर बंदी असली तरी काही उत्साही मंडळे बिनधास्तपणे कर्कश डॉल्बी वाजवत असतात आणि उत्सवात वाद नकोत म्हणून पोलिसही अनेकवेळा त्याकडे दुर्लक्ष करतात. आमच्याच सणांच्या वेळी अशी बंधने का असा प्रश्‍न विचारून विनाकारण वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्नही कोणी करू नये. कर्कश डॉल्बी आणि अचकट विचकट गाणी गणेशाला आवडत असतील का? याचा विचार करूनच उत्सव साजरा करायला हवा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशाच्या काही भागासह महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि इतर भागांत महापुरामुळे गंभीर स्थिती उद्‌भवली आहे. यंदा गणेशोत्सव साजरा करताना त्याचाही विचार व्हावा.

गणेशोत्सवावरील खर्च कमी करून काही भाग पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून द्यावा. दुसरीकडे राज्याच्या काही भागात दुष्काळी स्थिती आहे. त्या भागातील पीडितांना मदत करण्याचा विचारही या निमित्ताने पुढे यायला हवा. पूरग्रस्त आणि दुष्काळ पीडित दोघेही जरी समान उत्साहाने हा उत्सव साजरा करणार असले तरी त्यांच्या पाठीवर मदतीची थाप देण्याची जबाबदारी कोणालाच विसरून चालणार नाही. सरकारनेही हा उत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडेल यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. काही समाजकंटक आणि सामाजविरोधी घटक याच काळात सक्रिय होतात आणि सोशल माध्यमांचा वापर करून अफवांचा पूर निर्माण करतात. त्यामुळे वातावरण बिघडू शकते, असे काही होऊ नये यासाठी सरकारने प्रबोधन आणि दक्षता या दोन्ही पातळीवर काम करून अशा समाजकंटकांच्या डाव हाणून पाडायला हवा. त्याशिवाय या गणेशोत्सवात यावेळी दहशतवादाचेही विघ्न येण्याचे संकेत आहेत. गुप्तचरांनी तशी माहिती दिली आहे.

काश्‍मीरबाबतच्या ताज्या घटनांमुळे देशावर पुन्हा एकदा हे दहशतवादाचे सावट घोंगावू लागले आहे. उत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन दहशतवादी कृत्ये करण्याचा कट समोर येत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग असलेल्या प्रसादातून घातपात केला जाण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात आली आहे. राज्यात सार्वजनिक मंडळांची संख्या खूप आहे. या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भक्‍तांची मोठी गर्दी असते. यावेळी अनेक ठिकाणी महाप्रसादाचं वाटप केलं जातं. या प्रसादाच्या माध्यमातूनच विषबाधा केली जाऊ शकते. अशा प्रकारचा कट पूर्वी एकदा उघडकीस आल्याने यावेळीही अधिक सतर्क राहावे लागणार आहे. दुसरीकडे गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी कमांडो समुद्रमार्गे भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिला आहे. कच्छ परिसरातून ही घुसखोरी केली जाण्याची शक्‍यता आहे. भारतात ऐन गणेशोत्सवात दहशतवादी हल्ला करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा दहशतवादी संघटनांचा हेतू आहे. त्यामुळे त्या आघाडीवरही काळजी घ्यावी लागणार आहे.

दहशतवादाच्या या संकटाशिवाय देशातील नागरिकांना आर्थिक मंदीचीही काळजी आहे. देशातील विविध उद्योगक्षेत्रांत निर्माण झालेली मंदी आणि बाजारातील निरुत्साह याचा फटका यंदाच्या गणेशोत्सवालाही बसला आहे. आर्थिक पातळीवर असलेल्या उदासीनतेमुळे उद्योग जगत तसेच व्यापारीवर्गाकडून गणेशोत्सव मंडळांकडे येणारा निधीचा ओघही आटला आहे. तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे गणेशोत्सव मंडळांना मोठी झळ बसली होती. आता आर्थिक मंदीची झळ बसली आहे. एका आकडेवारीप्रमाणे गणेशोत्सवासाठी मंडळांना मिळणाऱ्या निधीत मागील वर्षांच्या तुलनेत सुमारे 25 टक्‍के घट झाली आहे. खरेतर गणेशोत्सवाच्या पाठोपाठ सर्वच उत्सवांचा हंगाम सुरू होत असला तरी बाजारातील मंदीची चिंता सर्वत्रच जाणवत आहे. सरकारनेच हे विघ्न दूर करायला हवे. उत्सव काळात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याने बाजारात उत्साह निर्माण होऊन अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकते; पण त्यासाठी सरकारने अर्थव्यवस्थेला आणखी काही बुस्टर डोस देण्याची गरज आहे.

थोडक्‍यात, सांगायचे झाले तर विघ्ने दूर करण्याचे गाऱ्हाणे जरी गणेशाला घालण्यात येत असले तरी समाजातील प्रत्येक घटकच आपली जबाबदारी ओळखून हा उत्सव निर्विघ्न करू शकतो. बुद्धीची देवता असलेला गणेश त्यासाठी निश्‍चितच सर्वांना तशी बुद्धी देईल. म्हणूनच सुखकर्ता आणि दुःखहर्ता असलेल्या गणेशाला विघ्ने दूर करण्याचे साकडे घालतानाच या गणरायाचे नेहमीच्याच उत्साहात स्वागत करायला हवे. सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)