पुणे – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पत्नी निलम राणे व मुलगा नितेश राणे यांना लुक आऊट नाेटीस पुणे पाेलीसांकडून देण्यात आली. याबाबत वळसे पाटील म्हणाले, यासंर्दभात केंद्र सरकारचे गृह विभागाकडून राज्यसरकारला एक पत्र प्राप्त झाले व सरकारने याेग्य कारवाई करावी असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे गृह विभागाचे वतीने यावर कारवाई करण्यात आली आहे.
राज्याचे पाेलीस महासंचालक यांना संबंधित तपास काेणाकडे द्यावा याचा अधिकार असून त्यांनी ताे पुणे पाेलीसांकडे साेपवला आहे. ईडीचे राज्यातील वाढत्या हस्तक्षेपाबाबत त्यांनी सांगितले की, ज्या गाेष्टींचा तपास राज्य सरकारची यंत्रणा करु शकते त्यात केंद्रीय यंत्रणाने हस्तक्षेप करणे हे राज्याचे हक्कावर अतिक्रमण करण्यासारखे आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ आयाेजित वार्तालाप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी पुणे पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपस्थित हाेते.
दरम्यान, ‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली. कंपनीकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे.
दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचं कर्ज घेतलं होते. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.
याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून ४० कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि त्याची देखील ३४ कोटीपर्यंत थकबाकी आहे. डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी ही लुक आउट नोटीस जारी केलेली आहे.