जीवनगाणे: खाली बघून चाल…

अरुण गोखले

एक आजोबा आणि त्यांचा चार-पाच वर्षांचा नातू मंदिराच्या पायऱ्या उतरत होते. प्रत्येक पायरीच्या उडीगणिक त्या लहान मुलाचा आनंद वाढत होता. तो उडी मारायचा आणि आनंदाने आजोबांच्या हातावर टाळी द्यायचा. अचानक नातवाची उडी चुकली. तो खाली पडला. गुडघ्याला लागले. डोळ्यात पाणीही आले. आजोबांनी त्याला उठवले, त्याचे कपडे झटकले, डोळ्यातले पाणी पुसले. त्याला जवळ घेत आणि खिशातले चॉकलेट देत ते म्हणाले, “”तरी मी तुला सांगत होतो खाली बघून चाल…”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आजोबांचे ते “खाली बघून चाल…’ हे शब्द ऐकले आणि मलाही वडिलांनी वेळोवेळी दिलेली “खाली बघून चाल’ ही शिकवण आठवली.
त्यांच्याबरोबर प्रथम जेव्हा मी सायकल चालवीत होतो तेव्हा त्यांनी विचारले, “”कसं वाटतंय?” मी म्हटले, “”खूप छान वाटतेय.” त्यावर ते म्हणाले, “”हे असं छान वाटत राहावं असं वाटत असेल तर एक कर, जो पायी चालतोय ना त्याच्याकडे पाहा म्हणजे तुझा आनंद टिकेल.”

त्यांच्या त्या शिकवणीचा जरी त्यावेळी नीट अर्थ कळला नव्हता, तरीपण त्यांचे अनुभवाचे बोल आहेत हे लक्षात घेऊन माझी जीवन वाट चालत आलो. आता मात्र जीवनातले अनेक बरे-वाईट अनुभव गोळा केल्यानंतर असं लक्षात येतंय की खरंच त्या सांगण्याला फार मोठा गुढार्थ होता. नाहीतरी जीवनात काय आहे? माणूस नेहमीच आपल्या सुखासमाधानाच्या आनंदाच्या पायऱ्या ठरवीत असताना तो खाली म्हणजे जो आपल्यापेक्षा कमी आहे, त्याच्याकडे न पाहता आपल्यापेक्षा जो वरचढ आहे, त्याच्याकडेच पाहात असतो आणि त्याच क्षणी मानवी मनात सुरू होणाऱ्या तुलनेने जे त्याच्याकडे आहे ते माझ्याकडे नाही, म्हणून तो जीवनात दु:खीकष्टी होत असतो. जे आहे त्याचा आनंद न घेता त्यांची खंत करण्यातच तो आपल्या जीवनातले आनंद अनुभवण्याचे अमोल क्षण वाया घालवत असतो. तुलनेने मनात ईर्ष्या, मत्सर, द्वेष जागतो. माणूस स्वत:च्या क्षमतांचा, परिस्थितीचा, आवाक्‍याचा विचार न करता वेड्यासारखा मृगजळा मागे ऊर फुटेपर्यंत धावत असतो. ती घाव, ती स्पर्धा, त्याला आनंदी नाही तर दु:खी करते. हे असं होऊ नये म्हणूनच तर असतो ना तो अनुभवी सांगावा की “”बाबा रे! वर पाहून नाही तर खाली बघून चाल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)