नवीन शैक्षणिक धोरणात एकविसाच्या शतकातील आव्हानांचा वेध

प्रकाश जावडेकर यांचे मत

पुणे : एकविसाव्या शतकातील आव्हानांचा वेध घेत शिक्षण क्षेत्रातील संक्रमण आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण आखण्यात आल्याचे मत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ व विद्यापीठ विकास मंचतर्फे “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ याविषयावर आयोजित वेबिनारमध्ये जावडेकर बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष भूषण पटवर्धन, प्रोगेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, इंदापूर शिक्षणसंस्थेचे संचालक हर्षवर्धन पाटील, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र परदेशी, नारळकर शैक्षणिक संस्थेचे संचालक प्रा. महेश आबाळे या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

भूषण पटवर्धन म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने झाली पाहिजे. भारताला हजारो वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभली असूनही आज जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठांची नावे दिसत नाहीत. विद्यापीठांद्वारे केवळ नोकर वर्ग तयार करण्याची प्रक्रीया खंडीत झाली असून समाज आणि उद्योगाभिमुख नागरिक आगामी काळात घडतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. शिक्षणाची संज्ञाच यामुळे बदलली गेली असून आदान-प्रदानाच्या माध्यमातून शिक्षण हे नवीन धोरण अस्तित्वात येईल.

डॉ. करमळकर म्हणाले, राज्याराज्यात विद्यापीठ पातळ्यांवर टास्क फोर्सची स्थापना करून नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रचार-प्रसार आणि अंमलबजावणी केली पाहिजे. प्रास्ताविक राजेश पांडे यांनी केले. या वेबिनारचे आयोजन राजेश पांडे, डॉ.प्रशांत साठे, डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर, डॉ. महेश आबळे, प्रसनजीत फडणीस आणि विजय सोनवणे यांनी केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.