जुन्या नोटा बदलणाऱ्यांवर नजर; सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जतन करण्याच्या आरबीआयकडून सूचना

मुंबई – नोटा बंदीच्या काळात नागरिकांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बॅंकात जाऊन बदलुन घेतलेल्या आहेत. त्याला बराच काळ लोटला असला तरी कोणी किती नोटा बदलून घेतल्या याची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर या काळातील बॅंकातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग जतन करण्याच्या सूचना रिझर्व्ह बॅंकेने व्यवसायिक बॅंकांना दिल्या आहेत.

त्यामुळे आगामी काळात गरज पडल्यास चौकशीला याची मदत होऊ शकणार आहे. रिझर्व बॅंकेने जारी केलेल्या सूचनेनुसार व्यवसायिक बॅंकांना 8 नाव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 या कालावधीतील सीसीटीव्ह फुटेज जतन करून ठेवावे लागणार आहे. हे फुटेज पुढील सूचना मिळेपर्यंत बॅंकांनी जपून ठेवावे असे सांगण्यात आले आहे. नोटा बंदीच्या काळात ज्यांनी गैरमार्गाचा वापर केला, त्यांची चौकशी अंमलबजावणी यंत्रणाद्वारे होत आहे. अशा परिस्थितीत हे फुटेज पुरावा म्हणून उपयोगी पडणार आहे.

काळा पैसा रोखण्यासाठी आणि दहशतवादाला मिळणारा पैशाचा पुरवठा कमी करण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद केल्या होत्या. जुन्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांनी बॅंकांमध्ये प्रदीर्घकाळ गर्दी केली होती. त्याच बरोबर कोणी किती नोटा बदलून घेतल्या, त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे याची स्वतंत्र चौकशी विविध यंत्रणांमार्फत चालू आहे.

याअगोदरही रिझर्व बॅंकेने 30 डिसेंबर 2016 रोजी व्यवसायिक बॅंकांना नोटा बंदीच्या काळातील सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता आणखी पुन्हा या सूचनेचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. नोटाबंदीच्या अगोदर पाचशे आणि हजार रुपयांच्या देशात 15.41 लाख कोटी रुपयाच्या नोटा होत्या. विशेष बाब म्हणजे त्यातील बहुतांश म्हणजे 15.31 लाख कोटी रुपयाच्या नोटा नागरिकांनी बदलून घेतल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.