तीन वेगवान गोलंदाज खेळवावे – आगरकर

इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाला सल्ला

मुंबई – न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचा अंतिम सामना तसेच त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने तीन वेगवान गलंदाज खेळवावेत, असा सल्ला माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने दिला आहे.

नवोदित महंमद सिराज चांगला गोलंदाज आहे. मात्र, पूर्ण तंदुरुस्त असतील तर जसप्रीत बुमराह, महंमद शमी व इशांत शर्मा या तीनही गोलंदाजांना अंतिम संघात स्थान द्यावे, असेही मत आगरकर याने व्यक्‍त केले आहे.

आगरकरने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सल्ला दिला आहे. महंमद सिराजला संघाबाहेर ठेवत अनुभवी गोलंदाजांनाच खेळवण्याचा दिलेला सल्ला कोहलीला पसंत पडेल का हाच प्रश्‍न आहे. कारण सिराज हा कोहलीचा सर्वात आवडता गोलंदाज असून, त्याच्यावर कोहलीचा सर्वाधिक विश्‍वास आहे. सिराजने कोहलीचा विश्‍वास अनेक वेळा सार्थही करून दाखवला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिराजने अफलातून कामगिरी केली असल्याने तो कोहलीची पहिली पसंती असेल यात शंका नाही.

इंग्लंडमधील वातावरण वेगवान व स्विंग गोलंदाजीला पोषक असते. मात्र, काहीवेळा कडक उनही दिसून येते. जर वातावरण ढगाळ असेल आणि खेळपट्टीवर गवत राखले गेले तरच कोहली संघात चार वेगवान गोलंदाज खेळवण्याचे धाडस दाखवेल. अशा स्थितीत सिराजलाही संधी मिळेल. मात्र, खेळपट्टी तिसऱ्या दिवसापासून फिरकीलाही साथ देणारी वाटली तर तीन वेगवान गोलंदाज व एक फिरकी गोलंदाज खेळवला जाण्याचीही शक्‍यता नाकारता येणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.