पुणे – स्वत:च्या जीवावर उदार होऊन समाजासाठी कर्तव्य भावनेने अविरत कार्य करणाऱ्या सेवाव्रती कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने दीर्घकालिन योजना करण्याची आवश्यकता असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
हेमंत रासने मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दोन हजार स्वच्छता कर्मचारी आणि चारशे वर्तमानपत्र वितरकांच्या कृतज्ञता सन्मान कार्यक्रमात पाटील बोलत होते. स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आमदार मुक्ता टिळक, भाजपचे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, मृणाल रासने, प्रमोद कोंढरे, उदय लेले या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार, आमदारसह सर्व पक्षीय पदाधिकारी व सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, वंचित घटकांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षण, आरोग्य, ज्येष्ठांना मदत, मूलभूत सुविधा भागविण्यासाठी कायमस्वरूपी योजना केली पाहिजे. त्यांचा आर्थिक भार कमी झाला तर ते ही आर्थिक बचत करू शकतील. त्यासाठी सरकारबरोबर विविध संस्था आणि कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे.
रासने म्हणाले, शहरामध्ये दररोज सतराशे मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन दहा हजारहून अधिक स्वच्छता कर्मचारी करीत असतात. कोविडच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून आणि कुटुंबाच्या आरोग्याची तमा न बाळगता या कर्मचाऱ्यांनी सामाजिक भावनेतून सेवाभावी वृत्तीने समाजाची सेवा केली.
तशाच प्रकारचे काम वृत्तपत्र वितरकांनी घरोघरी वर्तमानपत्र पोहोचवून केल्याचे त्यांनी नमूद केले. प्रमोद कोंढरे यांनी सूत्रसंचालन आणि राजेंद्र काकडे यांनी आभार प्रदर्शन केले. अनिल बेलकर, सौरभ रायकर, विनायक रासणे, किरण जगदाळे, नीलेश कदम, परेश मेहेंदळे, छगन बुलाखे, अश्विनी पांडे, अमित कंक यांनी संयोजन केले.