संगमनेर, (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्त्वावर उभ्या केलेल्या सहकाराने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शीपणे केलेल्या रचनात्मक वाटचालीमुळे संगमनेरचे सहकारचे मॉडेल हे भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार लंडनमधील शिष्टमंडळाने काढले आहे.
युरोपमधील व लंडनमधील शिष्टमंडळाने सहकाराच्या अभ्यास दौऱ्यासाठी संगमनेरच्या विविध सहकारी संस्थांना भेटी दिल्या. यामध्ये लंडन विद्यापीठाचे डीन जिरेमी स्मिथ, वरिष्ठ पत्रकार नाथाली मायरोथ, चैतन्य मार्क पवार हे होते. त्यांचे समवेत आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन संतोष हासे,
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ.सुजित खिलारी, संभाजी वाकचौरे आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, राजहंस ॲक्वा ,अमृतवाहिनी बँक,शेतकी संघ यांसह विविध शैक्षणिक संस्थांना ही भेटी दिल्या. यावेळी रणजीतसिंह देशमुख यांनी राजहंस दूध संघाची तर बाबा ओहळ यांनी कारखान्याची माहिती दिली. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सर्वांचे आभार मानले.