#लोकसभा2019 : मतदान केंद्रावरील ‘सेल्फी पॉईंट’ला भरुभरुन प्रतिसाद

सोशल मीडियावर सेल्फीचा पाऊस; ओसंडून वाहत होता तरुणाईचा उत्साह

पिंपरी – लोकसभा निवडणुकीचा राज्यातील चौथा व अंतिम टप्पा पार पडला. यामध्ये मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात तरुण व नव मतदारांचा टक्का लक्षणीय आहे. या नवतरुण मतदारांनी वोट करत त्याचा सेल्फी काढून तो सोशल मीडियावर टाकत त्यांची एक प्रकारे युवाशक्‍तीची मतदानाप्रतिची आवड आणि लोकशाहीविषयीची आस्था दाखवून दिली.

तरुणांची आवड लक्षात घेऊन मतदान विभागाने यंदा सेल्फी आणि फोटोसाठी विशेष व्यवस्था केली होती. निवडणूक आयोगाने असा प्रयोग पहिल्यांदाच केला आहे. नागरिकांनी निवडणूक विभागाच्या या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला. काही ठिकाणी नागरिकांनी मतदान केल्यानंतरया स्पॉट वर किंवा पाईंटवर फोटो काढण्यासाठी अक्षरशः रांग लावली होती.

केवळ तरुणच नव्हे तर ज्येष्ठ मतदारांनीही मतदान झाल्यानंतर फोटो व सेल्फी काढून आपल्या मित्रांना, स्वकीयांना पाठवत “आम्ही मतदान केले, तुम्हीपण करा’ अशी जनजागृती केली. सकाळपासून तरूण मतदारांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. व्हॉट्‌स ऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम हे फोटो खूप मोठ्या प्रमाणात पोस्ट झाले होते.

तरुणांसाठी मतदानानंतर सूट

पिंपरी येथील एका कॅफेमध्ये मतदान करणाऱ्या तरुणांना निःशुल्क कॉफी देण्यात आली. काही दुकानदार आणि व्यावसायिकांनी मतदान केलेल्या ग्राहकांना विशेष सूट दिली होती. एरव्ही मतदानाच्या दिवशी सुट्टीचा एन्जॉय घेणाऱ्या तरुणाईने मतदानाचा पुरेपूर आनंद घेतला. यामुळे नेहमीसारखे नीरस वातावरण न दिसता शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत होते.

“मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून तर मतदान केलेच आहे. पण ही शाई बोटावर असणे ही देखील एक फॅशन आहे. जसे टॅटू कूल असतात, तशीही शाईपण कूल फिलिंग देते. सर्व मित्र मैत्रिणींनी मतदान केले आहे. ही माझी मतादानाची पहिलीच वेळ आहे.
– प्रतिज्ञा कांबळे, पिंपरी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.