मुंबई – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024) पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule), शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे (Amar Kale), दिंडोरी मधून भास्करराव भगरे (Bhaskar Rao Bhagre) तर नीलेश लंके ( Nilesh Lanke) यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी या नावांची घोषणा केली. (Lok Sabha Election 2024 First list of NCP Sharad Chandra Pawar party announced)
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ?
बारामती लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार गटाने पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवर सुप्रिया सुळे यांचा थेट सामना महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत होऊ शकतो. दरम्यान अद्याप महायुतीने बारामतीतू उमेदवार जाहीर केलेला नाही. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यास बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळेल.
निलेश लंके विरुद्ध सुजय विखे –
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नीलेश लंके यांनी काल आमदारकीचा राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश केला तसेच लोकसभा लढवण्याचे स्पष्ट केले होते. लंके यांची थेट लढत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यासोबत होणार आहे.
डॉ. अमोल कोल्हे विरूद्ध आढळराव पाटील –
शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा एकदा शरदचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आढळराव पाटील हे असणार आहेत.
मागील लोकसभा लढतीत हेच दोन नेते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यावेळी अमोल कोल्हे विजयी झाले होते तर आढळराव पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी अमोल कोल्हे राष्ट्रवादी (घड्याळ चिन्ह) तर आढळराव पाटील शिवसेना (धनुष्यबान) चिन्हावर लढले होते. यावेळी उमेदवार तेच मात्र चिन्हांमध्ये आणि पक्षात बदल झालाय. यावेळी आढळराव पाटील राष्ट्रवादी (घड्याळ) चिन्हावर तर अमोल कोल्हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (तुतारी ) चिन्हावर निवडणुक लढवणार आहेत.