न्यूयॉर्क: अमेरिकेत पुन्हा करोनाच्या केसेस मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊनचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील अर्ध्या राज्यांमध्ये पुन्हा करोनाच्या केसेस वाढत असल्याचे असोसिएटेड प्रेसच्या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे.
लोकांनी अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन उठल्यानंतर मुक्त संचार सुरू केला असून अनेक ठिकाणी कार्यालयांमधील कर्मचारीही परतू लागल्यानंतर तेथे पुन्हा करोना केसेस वाढू लागल्या आहेत. हा सारा प्रकार पहिल्यानंतर आमच्या राज्यात शाळा आणि कार्यालये पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा लागणार आहे, असे नॉर्थ कॅरोलिनाच्या गव्हर्नरांनी म्हटले आहे.
या प्रसाराच्या वाढत्या प्रमाणाला केवळ एकच बाब कारणीभूत आहे असे नाही. काही ठिकाणी जादा टेस्टिंग केल्याने जादाचे रुग्ण आढळून आले आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील केसेस वाढल्याने राज्यातील करोनाग्रस्तांचे प्रमाण वाढलेले दिसते आहे त्यामुळे तेथे पुन्हा लॉकडाऊनसारखे कडक नियम करावे लागत आहेत. करोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे गुरुवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.