तालुक्यातील बाधितांची संख्या 32वर
जुन्नर -शहराच्या मध्यवस्तीतील एका युवकाला करोना झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांच्या कालावधीत जुन्नरचे नागरिक, पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासनाने अवलंबिलेल्या काटेकोर नियमावलीमुळे शहर करोनामुक्त होते. आता तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या 32 वर पोहोचली आहे.
शहरात करोनाचा रुग्ण राहात असलेला परिसर नगरपालिकेने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती जमा करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. तालुक्यात बुधवारी (दि. 10) कुसूर आणि धामणखेल या दोन गावांत प्रत्येकी एक करोना रुग्ण आढळला होता. आजअखेर तालुक्यातील 32 करोना बाधितांपैकी 21 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तालुक्यात दहा ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. या दहा ऍक्टिव्ह रुग्णांपैकी लेण्याद्रीच्या कोविड केंद्रात 4, पुण्यात औंध येथे 2, पिंपरीच्या वायसीएममध्ये 3 व रुबी हॉल क्लिनिकमध्ये एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
लेण्याद्री येथील केंद्रामध्ये आजअखेर एकूण 356 स्वॅबचे नमुने पुण्यात तपासणीला पाठवण्यात आले आहेत. तालुक्यात 4031 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यापैकी 109 संस्थात्मक तर 3922 होम क्वारंटाइन झालेले नागरिक आहेत. कोविड केअर सेंटरमुळे तालुक्यातील संशयित तसेच करोनाबाधित रुग्णांची पुणेवारी व तिथे होणारी ससेहोलपट थांबली आहे. या केंद्रातून उपचार घेऊन अनेक रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शाम बनकर यांनी सांगितले आहे.