प्रांताधिकाऱ्यांची माहिती : सात दिवसांत काटेकोर नियम पाळा
बारामती – शहरात सोमवारी (ता.7) पहाटे एकपासून ते 20 सप्टेंबर रोजी रात्री बारापर्यंत लॉकडाऊन संदर्भातील नियम प्रांताधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. 13 सप्टेंबर रोजी करोनाचा संसर्ग कमी झालेला आहे किंवा कमी होतो आहे, या संदर्भात आढावा घेऊन यापुढेही ते नियमित लागू करण्यासंदर्भात नव्याने आदेश दिले जाणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
कांबळे म्हणाले की, शहरातील जे प्रतिबंधित क्षेत्र असतील, ते क्षेत्र जवळपास शहराचा संपूर्ण परिसरामध्ये येत आहे. यामध्ये 65 वर्षावरील सर्व व्यक्ती, अति जोखमीची आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला व दहापेक्षा कमी वयातली मुले यांना अत्यावश्यक सेवा वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. अत्यावश्यक सेवेशिवाय इतर सर्व दुकाने बंद राहतील.
ऑनलाइन पोर्टलवरून मागवले जाणारे खाद्यपदार्थ सेवा बंद राहणार आहेत. सलून, ब्युटीपार्लर बंद राहतील. उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल, रिसॉर्ट, मॉल, बाजार मार्केट संपूर्णतः बंद राहतील. सर्व किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे, भाजीमार्केट, फळविक्रेते, आठवडे व दैनिक बाजार फेरीवाले व बाजार समिती बंद राहील. मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री बंद राहील. शाळा, महाविद्यालय, शिक्षण संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद राहतील. वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खासगी वाहनांना परवानगी असेल.
- वर्तमानपत्रांचे वितरण तीन तासांत होणार
दूध विक्री व घरपोच दुधाचे वितरण संपूर्ण कालावधीत सात दिवसांत सुरू राहील. सर्व खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा पशुचिकित्सा सेवांचे काम नियमित वेळेनुसार सुरू राहील. सर्व रुग्णालय व निगडीत सेवा सुरू राहील. सर्व मेडिकल दुकाने व दवाखाने तसेच ऑनलाइन औषध वितरण सेवा 24 तास सुरू राहील. पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी नऊ ते संध्याकाळी तीन या वेळेत सुरू राहतील. ते केवळ शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवेतील व पुरवठा साखळीतील वाहनांमध्ये इंधन पुरवठा करतील, एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार सुरू राहील. वर्तमानपत्रे, नियतकालिके यांची छपाई तसेच वितरण व्यवस्था व कार्यालय शासकीय नियमानुसार सुरू राहतील, मात्र, वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी सहा ते नऊ या वेळेतच करावे लागेल.
- राष्ट्रीयकृत बॅंका किमान मनुष्यबळावर सुरू
पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व टॅंकरला नियमानुसार परवानगी राहील. सर्व राष्ट्रीयकृत बॅंका नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरू राहतील. प्रतिबंधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा नियोजित असतील तर त्यांना यातून सूट देण्यात येणार असून त्यासाठी त्यांनी परीक्षेचे हॉल तिकीट मात्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योग 15 टक्के कर्मचारी क्षमतेतच सुरू ठेवता येईल. शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम चा पर्याय वापरण्यात यावा.