पुणे : भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेमध्ये (एफटीआयआय) गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या वसतिगृहाच्या बांधकामामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे काम करताना धुळीचे लोट परिसरात पसरत आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी इमारतींतील लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना श्वसन विकारांचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, या वसतिगृहाचे काम सुरू झाल्यापासून येथे बांधकाम आणि सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार महापालिका प्रशासन आणि “एफटीआयआय’कडे करूनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असे, स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
“एफटीआयआय’ आवारात मागील साडेतीन वर्षांपासून हॉस्टेलचे बांधकाम सुरू आहे. करोना काळात हे काम सुरू असताना यासाठी घेण्यात आलेल्या खड्डयात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांना डेंग्यूसदृश आजारांचा सामना करावा लागला. त्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या राडारोड्यामुळे दुर्गंधीही पसरली होती. त्यानंतर नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर हे बांधकाम पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले.
मात्र, आता हे काम पहाटेपासून सुरू केले जाते. त्यामुळे मोठा आवाज होत आहे. शिवाय बांधकामासाठी सिमेंट तसेच खडीचा वापर केला जातो. हे काम करताना, कर्मचारी वारंवार वरील बाजूने सिमेंटची पोती खाली टाकतात. तसेच प्लॅस्टरचे काम करताना मोठ्या प्रमाणात सिमेंट उडत आहे. दिवसभर हे काम सुरू असल्याने आसपासच्या नागरिकांच्या घरांमधील खिडक्यांवरही या धुळीचे थर साचले आहेत.
या धुळीमुळे लहान मुले आणि ज्येष्ठांना त्रास होऊ लागल्याने स्थानिक नागरिकांनी संबंधित कंत्राटदाराची अनेकदा भेट घेत तक्रार केली आहे. मात्र, त्यानंतरही काहीच खबरदारी घेतली जात नसल्याचा होत असून, काही नागरिकांनी याबाबत महापालिकेकडेही तक्रार केली आहे.