पीएमआरडीएच्या खासगी वित्तीय संस्थांना सूचना
पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत बांधकामांना कर्जपुरवठा करू नका, अशा सूचना पीएमआरडीएने बॅंकांबरोबरच खासगी वित्तीय संस्थांना दिल्या आहेत. यापुढे अनधिकृत बांधकामांना कर्जपुरवठा केल्यास अशा बॅंकांविरुद्ध कारवाइचा इशारा पीएमआरडीएने दिला आहे.
अनधिकृत बांधकामांना सहजपणे कर्जपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांमधील सदनिका, दुकाने यांची खरेदी-विक्री होते. या अनधिकृत बांधकामांना लगाम लावणे आवश्यक बनले आहे. अनधिकृत बांधकाम होणारच नाही, याची दक्षता घेण्यासाठी पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार यांनी विशेष मोहीम आखली आहे. त्यांतर्गत जनजागृती करण्याचे धोरण पीएमआरडीए राबवित आहे. या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएने पाऊले उचली आहेत.
पोलीस अधीक्षक सारंग आवाड म्हणाले, अनधिकृत बांधकामांना वित्त पुरवठा करणे हे त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे. अनधिकृत बांधकाम पाडले की, बांधकाम करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणे, महसुली बोजा चढणे हे होण्याबरोबरच बॅंकेचे कर्ज बुडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा बिगर बॅंकींग वित्तीय कंपन्यांवरसुद्धा कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल. त्यामुळे बिगर वित्तीय संस्थांनी कर्ज प्रकरण मंजूर करतानाच अधिकृत कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
पीएमआरडीएच्या हद्दीतील बांधकामांना मंजुरी देताना बॅंकांनी संबंधित बांधकामाला पीएमआरडीएची मंजुरी आहे का हे तपासावे. बांधकाम नकाशाची प्रत तपासून घ्यावी. तसेच इतर कागदपत्रांची तपासणी करावी.
– मिलिंद पाठक, अतिरिक्त आयुक्त