मुंबई – सन 2021 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी उत्तम परतावा देणारे ठरले. मुख्य निर्देशांकात या वर्षात 20 टक्क्यांनी वाढ झाली तर काही शेअरच्या भावामध्ये अनेक पटीने वाढ झाल्याचे दिसून आले. लॉईडस् स्टिल्स् इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरचा भाव दोन वर्षांपूर्वी केवळ 50 पैसे इतका होता.
दोन वर्षांमध्ये या शेअरच्या भावामध्ये तब्बल 4,900 टक्क्यांनी वाढ होऊन या शेअरचा भाव आता 24 रुपये 95 पैसे प्रति शेअर आहे. म्हणजेच दोन वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने जर एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर दोन वर्षानंतर ही गुंतवणूक तब्बल 50 लाख रुपयांची झाली आहे.
गेल्या सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरच्या भावात वेगात वाढला. सहा महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरचा भाव केवळ 3 रुपये 45 पैसे होता. तो आता 24 रुपये 95 पैसे इतका झाला आहे. गेल्या आठवड्यातही या कंपनीच्या शेअरच्या भावात 21 टक्क्यांनी वाढ झाली आणि हा शेअर 20 रुपये 65 पैश्यावरून 24 रुपये 95 पैशावर गेला आहे.
एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत केवळ एक रुपया होती. एका वर्षांमध्ये यात 2,400 टक्क्यांची वाढ होऊन या शेअरचा भाव 24 रुपये 95 पैसे झाला. दोन वर्षांमध्ये या शेअरची किंमत 4,900 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र सर्वच कंपन्यांचे शेअर अशा प्रकारे वाढत नसतात.त्यामुळे विचारपूर्वक एखाद्या कंपनीचा आणि क्षेत्राचा विचार करून गुंतवणूक केल्यास ती गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते असे दिसून येते.
सरलेला आठवडाही फायद्याचा
या शेअरच्या किमती ज्या प्रमाणात वाढल्या याचा विचार केला असता एखाद्या व्यक्तीने जर नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर एका आठवड्यामध्ये ही रक्कम 1लाख 21 हजार रुपये इतकी झाली असती. एक महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ही रक्कम 2 लाख 30 हजार रुपये झाली असती.