मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी स्तुतीसुमने उधळली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली.
राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने यावेळी जोरदार तयारी केली होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान मोदींच तोंड भरून कौतुक करण्यात आलं होत. आणि आता हाच धागा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर हल्ला बोल केला आहे.
“मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय!’ या आशयाची पोस्ट रोहित पवार यांनी केली असून, सध्या त्यांची ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. तसेच त्यांनी 2016 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमिपूजनाची देखील आठवण करून दिली आहे.
रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात….
“काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल! मात्र, 2016 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपूजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मूक अश्रू ढाळले असतील आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील!’ असं रोहित पवार म्हणाले आहेत.