Lioness Name – पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथून एक चकित करणारी बातमी आहे. येथील सफारी पार्कमध्ये सीता ही सिंहिण आणि अकबर या सिंहाला एकत्र ठेवल्यामुळे गदारोळ सुरू झाला आहे. हा अपमान असल्याचा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे.
याच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेने कोलकाता उच्च न्यायालयातही धाव घेतली असून सीता आणि अकबर यांना एकत्र ठेवण्याच्या प. बंगाल वन विभागाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिले आहे.
उपलब्ध असलेल्या बातमीनुसार विहिंपने १६ फेब्रुवारी रोजी कोलकाता उच्च न्यायालयाच्या जलपैगुडी खंडपीठाचा दरवाजा ठोठावला आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी होणार आहे.
वनविभागाचे अधिकारी आणि सफारी पार्कचे संचालक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. वनविभागाच्या म्हणण्यानुसार या सिंहांना अलिकडेच म्हणजे १३ तारखेला त्रिपुराच्या सिपाहीजला प्राणी उद्यानातून येथे आणण्यात आले आहे. त्यांचे नाव अद्याप बदलण्यात आलेले नाही.
अकबर हे मुगल सम्राटाचे नाव होते तर सीता ही हिंदु धर्मियांसाठी आदराचे स्थान आहे. त्यामुळे सीता आणि अकबर यांना असे एकत्र ठेवणे हिंदुंचा अवमान असल्याचे विहिंपचे म्हणणे आहे. या सिंहिणीचे नाव बदलण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे.