बार्सिलोना – लिओनेल मेस्सीने फुटबॉल सम्राट पेले यांच्या 643 गोलची बरोबरी करत नवा अध्याय घडवला. मात्र, तरीही त्याला आपल्या बार्सिलोना संघाला स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेतील वेलेन्सियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून देता आला नाही.
क्लब फुटबॉल क्षेत्रात पेले यांच्या नावावर 643 गोल होते. ही कामगिरी गेली अनेक वर्षे अबाधित होती. शनिवारी मेस्सीने वेलेन्सियाविरुद्धच्या सामन्यात 643 वा गोल केला व पेलेंच्या कामगिरीची बरोबरी केली.
मेस्सीच्या या कामगिरीवर खूष होत खुद्द पेले यांनी त्याचे कौतुक केले आहे. आधुनिक फुटबॉल क्षेत्रात मेस्सी हा ख्रिस्तियानो रोनाल्डोपेक्षाही जास्त उजवा आहे, मी देखील त्याच्या खेळाचा चाहता आहे, अशा शब्दांत पेले यांनी मेस्सीचा गौरव केला आहे.
अर्थात, मेस्सीच्या या कामगिरीनंतरही बार्सिलोनाला हा सामना बरोबरीत सोडवावा लागला. पहिल्या हाफमध्ये मेस्सीने गोल केला व पेलेंची बरोबरी केली. त्यानंतर रोनाल्ड अराऊजनेही गोल केला. मात्र, वेलेन्सियाच्या मुख्तार दियाखाबी व गोमेज गोन्सालीस यांनी गोल करत सामना बरोबरीत सोडवला.