हॅमिल्टन – कर्णधार केन विल्यमसन व टीम सेफर्ट यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने पाकिस्तानचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयासह रविवारी(20 डिसेंबर) यजमानांनी पाकिस्तानविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेले 164 धावांचे आव्हान न्यूझीलंडने सेफर्ट व विल्यमसन यांच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर 19.2 षटकांत केवळ 1 गडी गमावून पूर्ण केले. सेफर्टने 63 चेंडूत 8 चौकार व 3 षटकार फटकावताना नाबाद 84 तर, विल्यमसनने 42 चेंडूत 8 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 57 धावांची खेळी केली.
त्यापूर्वी, नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम साऊदीच्या गोलंदाजीसमोर एकवेळ पाकिस्तानची गत 3 बाद 33 अशी झाली होती. मात्र, यानंतर अनुभवी महंमद हाफीजने वादळी फलंदाजी केली. त्याने 57 चेंडूत 10 चौकार व तब्बल 5 षटकारांसह नाबाद 99 धावा केल्या. मात्र, त्याला नंतर स्ट्राईक न मिळाल्याने तो शतक पूर्ण करू शकला नाही. तरीही त्याने संघाला आश्वासक धावसंख्या उभारून दिली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 4 तर, इश सोधी व जेम्स निशम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 4 गडी बाद करणारा साऊदी सामन्याचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक –
पाकिस्तान – 20 षटकांत 6 बाद 163 धावा. (महंमद हाफिज नाबाद 99, महंमद रिझवान 22, टीम साऊदी 4-21). न्यूझीलंड – 19.2 षटकांत 1 बाद 164 धावा. (मार्टिन गुप्टील 21, टीम सेफर्ट नाबाद 84, केन विल्यमसन नाबाद 57, फहीम अश्रफ 1-19).