अबाऊट टर्न: लीला

हिमांशू

नवस बोला, उपास-तापास करा, साकडं घाला व वैकल्यं करा, मंत्र-तंत्र करा, गंडे-दोरे बांधा… काहीही करा! हीच वेळ आहे. घरात नवा पाहुणा येणार आहे. हो, पाहुणाच आला पाहिजे! पाहुणी अजिबात नकोय. कुटुंबाचं प्लॅनिंग कसं सेंद्रिय शेतीसारखं “झिरो बजेट’ असलं पाहिजे. मुलगा मोठा होईल, शिकून-सवरून “हापिसर’ बनेल, डॉक्‍टर-इंजिनिअर बनेल, “फॉरिन’ला जाईल, बक्‍कळ पैसा कमावेल. आपल्या देशाकडे, गावाकडे, घराकडे, आईबापाकडे त्यानं ढुंकून बघितलं नाही तरी चालेल; कारण तो आपलं नाव लावेल, आडनाव लावेल, आपला वंश आपल्या आडनावानिशी पुढं चालवेल.

परगावी, परदेशात आपल्या नजरेआड वाढला तरी आपलाच वंश तो! टाचा घासायची वेळ आपल्यावर आली, तरी आपण त्याबद्दल अभिमानच बाळगला पाहिजे. मुलगी झाली तर भलती कटकट! खर्च दुप्पट वाढलाय. पूर्वी मुलीच्या शिक्षणाकडे, करिअरकडे फारसं गांभीर्यानं पाहावं लागत नव्हतं. वयात आली की उजवून टाकायची, एवढंच बापाचं काम होतं.

पोरांना करिअरिस्ट, कमावती बायको हवी असते. म्हणजे पोरीला इमानदारीत शिक्षण द्यावं लागणार. संस्कार आणि सुरक्षितता द्यावी लागणार. शिवाय लग्नाचा खर्चही करावा लागणार. हुंडा, मानपान वगैरे रीतीभातीप्रमाणं करावं लागणार. एवढं करून शेवटी मुलगी म्हणजे परक्‍याचं धन! सगळी इन्व्हेस्टमेंट एका दिवसात मातीमोल! म्हणूनच, काहीही करून मुलगाच हवा! हीच वेळ आहे नशीब घडवण्याची.

नशिबाविषयी शंका असेल तर उत्तराखंडमध्ये जा. तिथं उत्तरकाशी नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या मातीनं पुत्रप्राप्तीसाठी इच्छुक असणाऱ्यांना कधीच निराश केलेलं नाही. नुकतीच पुढे आलेली, गेल्या तीन महिन्यातली आकडेवारी पुराव्यादाखल उपलब्ध आहे. या जिल्ह्याच्या 132 गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांत मुलगी जन्मलेलीच नाही. अधिकृत आकडेवारीनुसार, उत्तरकाशी जिल्ह्यातल्या संबंधित 132 गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांत 216 बालकांचा जन्म झाला.

सगळेच्या सगळे मुलगे! एकही मुलगी जन्माला आलेली नाही. घराघरात पुत्ररत्न… घराघरात आनंदीआनंद! मुला-मुलींच्या व्यस्त जननदरावरून आकांडतांडव करणारेसुद्धा शॉकमध्ये आहेत. कारण हजार मुलांमागे नऊशे मुली हे प्रमाण असताना जर ते साडेआठशेवर आलं, तरच त्यांना काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. 216 मागे शून्य हे मुला-मुलींचं प्रमाण ऐकून ते इतके सैरभैर झालेत, की भानावर यायलाच त्यांना आणखी तीन महिने लागतील. त्या तीन महिन्यांत उत्तरकाशी जिल्ह्यात आणखी किती मुलगे जन्माला येतील, कुणास ठाऊक! “बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा दिली जात असताना ही “लीला’ निसर्गाचीच असणार, असं काहींना वाटणं स्वाभाविक आहे. परंतु मुलींचा जननदर अचानक शून्यावर येण्याइतका निसर्ग निश्‍चितच निर्दयी नसणार, असं वाटणाऱ्यांनी या अजब प्रकाराबद्दल प्रश्‍न उपस्थित केलेत.

तीन महिन्यांत सर्वच्या सर्व मुलगेच जन्माला घालणारी गावं एकाच जिल्ह्यातली असल्यामुळं संशयाचं पिशाच्च जिल्हा प्रशासनाच्या मानगुटीवर बसलंय. मुलींची संख्या शून्यावर आणणारी 132 गावं आढळली; पण मुलींची संख्या कमी करणारीसुद्धा गावं आसपास असणारच! मातांच्या पोटातून मुली गायब करणाऱ्या या जादूला काय म्हणायचं? ज्या गावांना मुलींचं एवढं वावडं, तिथल्या मुलांना मुली देणं वधूपित्यांनी बंद करावं हेच उत्तम! फक्‍त पुरुषांची गावं म्हणून ती नावारूपाला तरी येतील!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)