हसन मुश्रीफ यांच्या घरासह साखर कारखान्यावर आयकर विभागाचा छापा

पुण्यात राहणाऱ्या मुलाच्या घरावरही कारवाई; छाप्यामुळे जिल्ह्यात खळबळ

कोल्हापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते आणि कोल्हापूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानांसह सहा ठिकाणी आयकर विभागाने आज छापेमारी केली. कोल्हापुरात दोन ठिकाणी, त्याचबरोबर कागल, संताजी घोरपडे साखर कारखाना आणि पुणे या ठिकाणी छापे टाकण्यात आले. मुश्रीफ यांच्या निवासस्थान कारखाना आणि इतर ठिकाणी अचानक पडलेल्या छाप्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांचे सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी कागलमध्ये आगमन झाले. त्यानंतर मुश्रीफ यांच्या पाठोपाठ अवघ्या 10 मिनिटांमध्ये पुणे विभागातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा ताफा निवासस्थानी दाखल झाला. त्यानंतर मुश्रीफ आणि अधिकारी घरामध्ये आत गेल्यानंतर अजूनही बाहेर येऊ शकलेले नाहीत. छापा टाकण्यासाठी एकुण 15 जणांची टीम पोहोचली होती.

ही बातमी वाऱ्यासारखी कार्यकर्त्यांमध्ये पसरली. शेकडो कार्यकर्ते आमदार मुश्रीफ यांच्या निवासस्थानी तळ ठोकून आहेत. कार्यकर्त्यांनी काही काळ कागल बंद ठेवण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्ते तसेच समर्थकांकडून निषेध फेरी सुद्धा काढण्यात आली. कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी मुश्रीफ यांनी खिडकीमध्ये येऊन मी तर फकीर आहे, असे सांगून अभिवादन करून आत निघून गेले.

दुसरीकडे आमदार हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव साजिद यांच्या कोंढवा, हडपसर येथील दोन फ्लॅटवर तसेच शिवाजीनगर येथील कार्यालयावर छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील आशोका मुझ सोसायटी व अमोनोरा पार्क येथील फ्लॅटवर सकाळी छापे टाकण्यात आले. सकाळी 6 च्या सुमारास 18 ते 20 अधिकारी फ्लॅटवर येऊन धडकले. त्यामध्ये काही महिला अधिकारी देखील होत्या.

पुण्यातील अमोनोरा पार्क येथील घरांची झडती सुरू झाली तेव्हा घरातील सदस्य बाहेर निघून गेले. अशोक मुझ सोसायटीतील फ्लॅट तन्वीर बिडीवाले यांच्या नावावर आहे. तिथे साजिद हे भाड्याने राहत होते. तन्वीर बिडीवाले हे साजिद यांचे नातेवाईक असून छाप्यावेळी तिथे उपस्थित होते. आयकर विभागाकडून घरातील कागदपत्रे व इतर तपासणीचे काम अद्याप सुरू असून ते उशीरापर्यंत चालण्याची शक्‍यता आहे. आयकर विभागाकडून छाप्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त न घेता मुंबई रेल्वे पोलिसांची मदत घेतली असून कारवाई बाबत पूर्ण गोपनीयता बाळगण्यात येत आहे.


पोलीस बंदोबस्तात ही जनता दरबार

आमदार मुश्रीफ मुंबईवरून आठ वाजता घरी पोहोचले. नेहमीप्रमाणेच मुश्रीफ यांची कार्यकर्ते आणि कामासाठी आलेली जनता सकाळी सहापासूनच वाट पाहत बसली होती. अशा कडक बंदोबस्तात मुश्रीफ यांचे टायपिंग मशीन पोलिसांच्या ताब्यात असताना सुद्धा स्वीय सहाय्यक उदय पाटील यांच्याकडून हाताने लिहिलेल्या 25 हून अधिक पत्रांवर सह्या केल्या. या पत्रांमध्ये बहुतांशी पत्रेही रुग्णांवर करायच्या मोफत वैद्यकीय उपचारांची होती. पोलीस बंदोबस्तात अधिकाऱ्यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तरे देत असतानाही मुश्रीफ रुग्णांच्या उपचारांच्या पाठपुराव्याची चौकशीही आस्थेवाईकपणे करीत होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)