सोलापूर – तीर्थक्षेत्र शेगाव मधील ‘आनंद सागर’ प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूरमध्ये व्हायला हवे, हे उद्यान उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश विधानपरिषदेच्या उप सभापती शिवसेना नेत्या आ. डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले. पंढरपूर शहरातील विकासकामे अन श्री विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी डॉ गोऱ्हे यांनी ऑनलाइन बैठक घेतली.
पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थस्थळ आहे दरवर्षी लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. दर्शनानंतर त्यांना क्षणभर विरंगुळा घेण्यासाठी एक प्रसन्न, प्रशस्त आणि शांत जागा असायला हवी. शेगावमध्ये आनंद सागर हे सुंदर उद्यान उभारले आहे. पंढरपूरमध्ये असे एक उद्यान असायला हवे, असे डॉ गोऱ्हे म्हणाल्या.
भारतीय पुरातत्व विभागाकडे प्रलंबित असलेल्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. मंदिराशी निगडित श्री विठ्ठल मूर्तीचे संवर्धन, रखडलेला स्कायवॉक, परिवार देवता आणि मंदिरातील डागडुजी या विषयी झालेल्या कामांची माहिती यावेळी डॉ गोऱ्हे यांना देण्यात आली.
डॉ गोऱ्हे यांनी लॉकडाऊन पूर्वी घेतलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या विशेष बैठकीमुळे लॉकडाऊन काळात मंदिर समितीला मंदिरातील अनेक कामे करता आली याबद्दल डॉ गोऱ्हे यांना आभार देण्यात आले.
मंदिराच्या रखडलेल्या कामांना गती मिळाल्याबद्दल डॉ गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त करीत उर्वरित कामाबाबत लवकरच पुरातत्व विभागाची बैठक बोलावणार असल्याचे सांगितले.