मुंबई – महाराष्ट्रातील मंदिरांवरुन सध्या अनेक वाद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या फलकावरुन मोठा वाद निर्माण झालेला. त्यातच आता महाराष्ट्र मंदिर महासंघाने एक घोषणा केली आहे. नागपुरातील चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे, अशी मागणीही महाराष्ट्र मंदिर महासंघाने केली आहे. पहिल्या महिन्यात नागपुरातील 25 तर राज्यभरातील 300हून अधिक मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू करण्याचे प्रयत्न करणार असल्याचेही महासंघाने म्हटले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर सावरबांधे यांनी भक्तांप्रमाणेच पुजाऱ्यांनाही वस्त्र संहिता लागू करावी; अशी मागणी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू झाली पाहिजे, मंदिराचे पावित्र्य जपले गेले पाहिजे. मंदिरात अंगप्रदर्शन होणार नाही, असभ्य, अशोभनीय व तोकडे कपडे घालून प्रवेश करू नये यासाठी नियम लागू करण्यात आला आहे, अशा अनेक मागण्या यापूर्वीही महासंघाने केल्या आहेत. तर राष्ट्रवादीचे सावरबांधे म्हणाले की शेगावच्या संत गजानन मंदिरात पुजारी आणि सेवक पैजामा, शर्ट आणि डोक्यावर टोपी या एकाच पोशाखात असतात. त्याच प्रमाणे इतर मंदिरातही तशा किंवा इतर पारंपरिक पोशाखात पुजारी असावेत, अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे त्यांचा या मागणीचे पुजाऱ्यांनी स्वागत केले आहे. सर्व पुजाऱ्यांनी एकच वस्त्र संहिता असेल तर यात काहीच हरकत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.