पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (आयपीए) पुणे शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कोकाटे यांच्या हस्ते प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया सन्मानित करण्यात आले. ‘आयपीए’च्या वतीने राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाचा पारितोषिक वितरण समारंभ ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये नुकताच पार पडला.
या कार्यक्रमात जेएसपीएम युनिव्हर्सिटीच्या फार्मास्युटिकल सायन्सचे संचालक डॉ. एम. डी. बुरांडे, एव्हरेस्ट फार्माचे संस्थापक संचालक गोपाल वर्मा, ‘आयपीए’चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर बांबडे, सचिव डॉ. एल. सत्यनारायणन, एमसीई सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य विजय जगताप, ‘सूर्यदत्त’चे संचालक प्रशांत पितालिया आदी उपस्थित होते. सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या वतीने डॉ. चंद्रकांत कोकाटे यांना ‘सूर्यभूषण’, तर डॉ. बुरांडे व गोपाल वर्मा यांना ‘सूर्यदत्त फार्मा एक्सलन्स अवॉर्ड २०२३’ने गौरविण्यात आले. तसेच ‘आयपीए’च्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाच्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थी व संघाना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. पदविका प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने जिंकले. जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ़ फार्मसी ताथवडे आणि नऱ्हे येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ फार्मसी यांनी संयुक्तपणे द्वितीय पारितोषिक पटकावले. पदवी गटात एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसीने प्रथम, सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी नऱ्हे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. पदव्युत्तर गटात भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसीने विजेतेपद, तर एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी यांनी उपविजेतेपद मिळवले.
डॉ. चंद्रकांत कोकाटे म्हणाले, “नवीन शैक्षणिक धोरणामुळे नाविन्यपूर्ण संशोधन, इनोव्हेशन आणि नवनिर्मितीला चालना देण्यासाठी उद्योग आणि शिक्षण क्षेत्राची सांगड घालणे अधिक महत्वाचे बनले आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना घडविणे, त्यांच्याशी अनुभवाची देवाणघेवाण करणे, गरजेनुसार अभ्यासक्रम बदलणे आदी गोष्टींसाठी पुढाकार घ्यावा. शिक्षण क्षेत्राने आवश्यकतेनुसार या बदलांचे स्वागत करायला हवे.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सलग दुसऱ्या वर्षी ‘आयपीए’चा हा कार्यक्रम ‘सूर्यदत्त’मध्ये होत असल्याचा, तसेच डॉ. कोकाटे, डॉ. बुरांडे, गोपाल वर्मा यांना सन्मानित करताना आनंद वाटतो. सन्मानित तज्ज्ञांचा आदर्श घेत विद्यार्थ्यांनी संपूर्ण क्षमतेने ज्ञानार्जन करावे. फार्मा सेवा क्षेत्र संपूर्ण समाजाकरिता असून, विदयार्थ्यांनी स्वतःला त्या दृष्टीने घडवावे. विविध कारणांनी मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यावर उपाययोजना शोधणाऱ्या सक्षम विद्यार्थ्यांना घडवणे गरजेचे आहे. भारतातील तरुणांनी जागतिक दर्जाचे समाजोपयोगी व सर्वांगीण शिक्षण आत्मसात करायला हवे.”
डॉ. एम. डी. बुरांडे यांनी फार्मा क्षेत्रातील त्यांचे अनुभव सर्वांसमोर ठेवले. गोपाल वर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन डॉ. बविता अग्रवाल व प्रियांका कंधारे यांनी केले.