सातारा, (प्रतिनिधी) – कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून, सातारा जिल्ह्यात चार पोलीस निरीक्षक बदलून आले आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्याकडे, तर शाहूपुरी पोलीस ठाण्याचा कार्यभार पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्याकडे देण्यात आला आहे.
राजेंद्र मस्के यांनी सोमवारी कार्यभार स्वीकारला. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. मस्के यांनी 32 वर्षांच्या सेवाकाळात अमरावती, नागपूर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर येथे काम केले आहे. त्यांचे गाव सांगली जिल्ह्यातील सावळज हे आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे हे सध्या जिल्ह्यात असले, तरी शाहूपुरी पोलीस ठाण्याचा कार्यभार त्यांनी अद्याप स्वीकारलेला नाही. त्यांच्याकडे सध्या सातारा तालुका पोलीस ठाण्याचा कार्यभार आहे.
सांगली जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडे वाई पोलीस ठाण्याचा, तर विशेष सुरक्षा विभागातून बदलून आलेल्या घनश्याम सोनवणे यांच्याकडे वडूज पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव सातारा शहरचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांची कराड तालुका पोलीस ठाण्यात यापूर्वीच बदली झाली आहे. शिवजयंतीच्या बंदोबस्तानंतर या पोलीस अधिकार्यांनी नेमणुकीच्या ठिकाणी तात्काळ हजर व्हावे. त्याबाबतचे अहवाल सादर करावेत, असे निर्देश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.