वाई – वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बॅंकेचा परवाना रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मंगळवारी (दि. 11) रद्द केला आहे. या बॅंकेकडे व्यवहारासाठी पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने व्यवसायाचा परवाना रद्द करण्यात आल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक योगेश दयाळ यांनी यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे.
सातारा येथील विशेष लेखापरीक्षक (सहकारी संस्था) विजय दत्तात्रय सावंत यांनी हरिहरेश्वर सहकारी बॅंकेचे संस्थापक-संचालक नंदकुमार ज्ञानेश्वर खामकर, संचालक वजीर कासमभाई शेख, पदाधिकारी, संचालक आणि अधिकाऱ्यांविरोधात 26 ऑगस्ट 2021 रोजी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बॅंकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, रोखपाल, तीन सनदी लेखापालांसह 29 जणांनी संगनमताने 112 कर्जदारांच्या नावे बनावट कागदपत्रे व दस्तऐवज तयार केले. गहाणखत आणि कर्जप्रकरणे दाखवून, बांधकाम केलेल्या सदनिका कर्जदारांना दिल्याचे दर्शवून आणि संबंधितांच्या नावे कर्जे घेऊन बॅंकेच्या निधीचा अपहार केला. बॅंकेच्या सभासदाची आणि ठेवीदारांची 42 कोटी 46 लाख 89 हजार 344 रुपयांची फसवणूक केल्याचे या तक्रारीत म्हटले होते.
याप्रकरणी सातारा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नंदकुमार खामकर यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. त्यापैकी पाच जणांची जामिनावर मुक्तता झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बॅंकेवर प्रशासक नेमण्यात आला असून, कर्जवसुली सुरू आहे. ठेवीदारांच्या पाच लाख रुपयांपर्यंत 99.96 टक्के ठेवींची 57.24 कोटी रुपयांची रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून 8 मार्चपर्यंत ठेवीदारांना परत देण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने हरिहरेश्वर बॅंकेचा परवाना रद्द करताना बॅंकिंग व्यवसाय करण्यास मनाई, ठेवी स्वीकारणे आणि ठेवी परत करण्यास मनाई केली आहे. बॅंकेच्या कारभारातील अनियमिततेबाबत आणि बॅंकेवर अवसायक नेमण्यात आल्याचे सहकार विभागानेही रिझर्व बॅंकेला कळवले होते. त्याप्रमाणे ही कारवाई केली आहे.