ढेबेवाडी – सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे राज्याचे नेतृत्व करत आहेत. तर पाटण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी शंभूराज देसाई जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आम्ही सर्व जण जनतेच्या विकासाला गती देऊ. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मसणाईमातेने आशीर्वाद आणि ताकद द्यावी, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले.
साईकडे (ता. पाटण) येथील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोरे यांच्या आग्रहामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गावालगत असलेल्या नदीचे पात्र गावाकडे सरकू लागल्याने या धोकादायक ठिकाणांची पाहणी, तसेच ग्रामदैवत मसणाई माता देवीचे दर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. प्रवीण दरेकर, ऍड. भरत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, उद्योजक सर्जेराव यादव, महेंद्र मोरे, सुनील मोरे, सरपंच सूरज यादव, उपसरपंच गणेश यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील चाललेल्या या शासनाच्या माध्यमातून राज्याचा विकासरथ जोमाने घौडदौड करत आहे. आता येथील गावकऱ्यांनी विविध विकासकामांची मागणी केली. निश्चितच येथील लोकप्रतिनिधी या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आम्ही मित्र आहोत. आम्ही आपल्या मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊ. आपल्या गावाची पावसाळ्यात कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी सुरक्षितता म्हणून उपाययोजना करण्याबाबतही संबंधितांना आदेश देऊ.” प्रास्ताविक विनायक चव्हाण यांनी केले. स्वागत राहुल पाटील, सर्जेराव यादव, सुनील मोरे यांनी केले.
खासदारांनी केले सारथ्य ..!
खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाचे सारथ्य केले. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आ. प्रवीण दरेकर हेही याच गाडीतून कार्यक्रम संपल्यानंतर कराडकडे रवाना झाले.