सेवेचा, सुरक्षिततेचा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया- महापौर

पुणे: पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे देशात वेगळे स्थान निर्माण करून आहे. पुण्याच्या गणेशोत्सवासाठी देशातून नव्हे तर जगभरातून भाविक येतात. दरवर्षी अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने धार्मिक स्वरूपात पुण्याचा गणेशोत्सव साजरा होत असतो. परंतु यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना एकूणच जगावरचे, देशावरचे करोनाचे संकट आपल्याला ज्ञात आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव सार्वजनिक मंडळे असतील, घरगुती गणपती असतील या सर्वांनी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले,पुणे शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की, गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक असावा. आपण यावर्षी असे म्हटले आहे की, प्रत्येकाने आपल्या घरातील गणेशमूर्तीचे विसर्जन घरातच करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मांडवातच मूर्तींचे विसर्जन करावे. आणि त्यामुळे विसर्जन करताना तेव्हा ती मूर्ती पर्यावरण पूरक, शाडू मातीची असावी, ही सध्याची गरज असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.

गणेशोत्सवात करोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याचे आपण टाळूया. आपला उत्सव आहे, आपल्या मनामध्ये भावना आहे. आपण हा उत्सव नक्की साजरा करू परंतु यावर्षी थोडेसे सामाजिक भान आहे, हे आपण सगळ्यांनी जपूया, असे आवाहनही मोहोळ यांनी केले आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाची जी मोठी मंडळे आहेत. तेथे मोठ्या संख्येने गर्दी होते. त्यांना असे आवाहन करतो की, त्यांनी आपल्या बाप्पाचे दर्शन ऑनलाइन पद्धतीने देशातील, परदेशातील, राज्यातील आणि शहरातील जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करावा, असेही मोहोळ यांनी सुचवले आहे.

खरेतर सार्वजनिक मंडळांनी ही भूमिका नक्की घेतली आहे की साधेपणाने आम्ही उत्सव साजरा करणार आहोत. त्यामध्ये शहराचा प्रथम नागरिक म्हणून या सगळ्यांना आवाहन करेन की, यावर्षीचा गणेशोत्सव हा सेवेचा, सुरक्षिततेचा आणि पर्यावरणपूरक साजरा करूया, असे सांगून, मोहोळ यांनी सर्व भक्तांना गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.