सातारा : पत्ते, जुगार अथवा इतर कोणतेही अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांचे भय असावे लागते अन् ते आहे. मात्र, वडूज पोलीस ठाण्यात कार्यरत असणारा हवालदारच पत्ते खेळणारांना रोखण्याचे काम करण्याऐवजी स्वत: त्यांच्यासोबत पत्ते खेळत असल्याचा व्हिडिओ दै. ‘प्रभात’च्या हाती आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वडूज पोलीस ठाण्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कारभारी बदलून सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराजे देशमुख यांची बदली केली. पण केवळ सेनापती बदलून चालणार नाही तर तक्रारी असणारे सैन्यही बदलावे लागेल हे या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. या हवालदाराच्या कामाच्या पध्दतीमुळे ते नेहमीच वादग्रस्त ठरले आहेत.
त्यांच्या काही प्रकरणांची धुळ खाली बसते न बसते तोच त्यांचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे हे महाशय पोलीस दलाचा गणवेश असलेली खाकी पॅंट व पोलीस दलात वापरला जाणारा बुट घालून इतर लोकांसमवेत पत्ते खेळत बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
कडक कारवाई करणार
वडूज पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याची माहिती मिळाली. त्याची सत्यता पडताळून संबंधितांवर कडक कारवाई करू.
बी.बी.महामुनी (पोलीस उपअधीक्षक).