“शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा…”;भाजपच्या ‘या’ नेत्याचा सरकारला इशारा

भाजप आणि सरकार यांच्यात कलगीतुरा रंगणार

मुंबई : दरवर्षी 19 फेब्रुवारीला देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होते. महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पण, यंदा मात्र शिवजयंतीवर कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सावट असणार आहे. दरम्यान, राज्यात काल पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळे गृहविभागाने नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. यावरूनच भाजप आणि सरकार यांच्यात कलगीतुरा रंगणार असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, शिवजयंती उत्साहात साजरी करू द्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला आहे. राम कदम यांनी पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरत आहे. टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. विविध पक्षांच्या रॅली, पदयात्रा, सभा, राज्यभर होतात. त्याला प्रशासन परवानगी देते. मात्र हिंदुत्ववादी स्वराज्य ज्यांनी सुरू केले. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही.

शिवरायांच्या महाराष्ट्रात हे घडतंय आणि ही शरमेची गोष्ट आहे. आपण खुद्द हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होतात. आपला पक्षही शिवरायांच्या नावाने चालतो. अशावेळी शिवरायांची जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी करण्यावर निर्बंध का लादले जात आहेत? असा सवाल राम कदमांनी पत्रातून केला आहे.

कदम यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसात सातत्याने महाराष्ट्रात हिंदूंची गळचेपी होताना दिसते. पालघरमध्ये साधूंवर हल्ला झाला मात्र राज्य सरकारने ठोस कारवाई केली नाही. तांडव या वेबसीरिजच्या माध्यमातून हिंदू देवदेवतांचा अवमान केला. पण सरकार गप्प बसलं. आता तर शिवजयंती साजरी करण्यावर निर्बध घालून पुन्हा एकदा हिंदूंचा अवमान करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या पत्राद्वारे माझी तुम्हाला विनंती आहे की, शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.