रावणगाव (वार्ताहर) – मळद (ता. दौंड) येथील मळद व रावणगाव या दोन गावांच्या सीमेवर मळद हद्दीतील एका शेतात रविवारी (दि. 7) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बिबट्यासदृश्य प्राणी दिसल्याची माहिती येथील शेतकरी कल्याण आटोळे यांनी दिली.
रविवारी कल्याण आटोळे हे शेतात काम करत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एका उसाच्या शेतातून हा बिबट्यासदृश प्राणी चालत येत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी मोठा आवाज केल्यानंतर तो प्राणी उसात पळून गेला. त्या परिसरात दोन-तीन दिवसांपासून या प्राण्याच्या पावलांचे ठसेही दिसत असल्याचे त्यांनी पाहिले आहेत. त्यामुुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या शेतातील विविध पिकांना पाणी देणे, खुरपणी तसेच विविध मशागतीची कामे शेतकरी करीत आहेत. मळद परिसरात बिबट्यासदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याने या परिसरातील नागरिक पुरते भयभीत झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक रात्री-अपरात्री विद्युत पंप चालू करण्यासाठी अथवा शेतीला पाणी देण्यासाठी घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.
मळद येथील शेतात आढळलेला प्राणी हा बिबट्या नसून तरस आहे. बिबट्या आणि तरस हे प्राणी दिसायला सारखेच असून तरसाच्या अंगावर पट्टे असतात तर बिबट्याच्या अंगावर ठिपके असतात. तरस हा प्राणी खडकी, रावणगाव, मळद, स्वामी चिंचोली, राजेगाव, लोणारवाडी परिसरात आढळून येतो. तरस हा प्राणी माणसावर हल्ला करत नाही, असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.